शुक्रवारी 482 कोटींच्या दोन रस्त्यांचे भूमिपूजन

संत एकनाथ महाराज पालखी मार्गासह पंढरपूर- मायणी रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने 482 कोटी रूपये मंजूर केले असून याचे भूमिपूजन येथे वन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेले आठ कोटी रूपये खर्चाचे तुळशी वृंदावन व सव्वा दोन कोटी रूपयांच्या नगरपरिषदेच्या विश्रामगृहाचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी 25 रोजी होत असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे असणार आहेत.  पंढरपूर येथील तुळशी वृंदावनासाठी कोट्यावधीचा खर्च झालेला आहे. यमाई तलावाच्या शेजारी तुळशी वृंदावानची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायात मान असलेल्या संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत सावता माळी या संतांची संगमरवरी शिल्पे बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर येथे विविध प्रकारच्या तुळशीचे आणि  फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. य मधोमध संगीत कारंजे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तुळशी वनामध्ये 24 फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. याच बरोबर वारकरी संप्रदायाची माहिती देणारी फायबरची भित्ती शिल्प  येथे साकारण्यात आली आहेत.
पंढरपूर-दिघंची-मायणी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या यादीमध्ये घोषित झाला नव्हता. पंढरपूर शहरापासून जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने राज्य महामार्ग रस्ता म्हणून दुरूस्त करून मिळावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी  बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली होती. त्यानुसार हायब्रीड अ‍ॅन्युटी या योजनेमधून महाराष्ट्र शासनाने सदर रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला व मायणी-दिघंची-पंढरपूर या राज्यमार्गासाठी 278 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. वाहतुकीचा ताण पाहता याच मार्गावरील शहरापासून ते बायपास रोड पर्यंतचा रस्ता हा चौपदरी केला जात आहे. परिचारक यांनी बांधकाममंत्र्यांकडे चौपदरीकरणाची मागणी केली होती. याचे भूमिपूजन शुक्रवारी नवीन कराड नाका येथे होत आहे.
जिल्हा हद्दीतील मुळशी-अरण-करकंब-व्हळे-कौठाळी-पंढरपूर (या रस्त्यावरून संत एकनाथ महाराज पालखी येते) या रस्त्यासाठी 204 कोटी इतका निधी मिळाला असून सदर रस्त्याचे भूमिपूजन देखील  शुक्रवारी होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर येथे 2 कोटी 32 लाख रूपये खर्च करून नवीन विश्रामृगह बांधण्यात आलेले आहे, त्याचे लोकापर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!