शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता सोमवारी पौर्णिमेदिवशी झाली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या परिवार देवतांमध्ये असणार्या या देवीची विधीवत पूजा आज सकाळी करण्यात आली होती. याच बरोबर तालुक्यातील भाळवणी येथे असणार्या प्रसिध्द मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.
येथे अनेकांच्या घरी शाकंभरी देवीचे नवरात्र असते. पौर्णिमेदिवशी या निमित्त देवीला 86 प्रकारच्या भाज्या व पक्वान्नांचा नैवेद्य दाखविला गेला. पहाटेपासून यासाठी महिला वर्गाची लगबग सुरू होती. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या परिवार देवतात असणार्या शाकंभरी देवीच्या मंदिरात आज सकाळी पूजा करून सुंदर सजावट करण्यात आली होती. येथे दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. तसेच भाळवणी येथील शाकंभरी देवी मंदिरात ही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.