सहकार शिरोमणी पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवा
सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंतदादा काळे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराच्या निवड समितीची बैठक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वसंतदादा काळे साहित्यकृती पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्रातील सामाजिक, कृषी, शैक्षणिक व साहित्यकृती आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्तींना प्रतिष्ठानच्या वतीने येत्या फेब्रुवारीत समारंभपुर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीची बैठक झाली यावेळी जेष्ठ ग्रामीण साहित्यिक द.ता.भोसले, सिद्धार्थ ढवळे, बाळासाहेब काळे, शिवाजीराव बागल, भाऊसाहेब जगताप, सुधाकर कवडे, महादेव देठे, डॉ. सुधीर शिनगारे,नाना काळे उपस्थित होते,
साहित्यकृती पुरस्कारांव्यतिरिक्त इतर कोणताही प्रस्ताव न मागवता समितीच्या वतीने संबंधित व्यक्तींच्या कार्याची माहिती घेऊन, त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. १० हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून *राज्यातील साहित्यिकांनी आपल्या कथा संग्रह, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र , काव्य संग्रह, ललित लेख संग्रह अशा सर्व प्रकारच्या साहित्यकृती दोन प्रतीमध्ये २५ जानेवारी पर्यंत कार्यवाह : वसंतदादा काळे पुरस्कार निवड समिती, द्वारा स.शि. वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संपर्क कार्यालय, सरगम चौक पंढरपूर या पत्यावर पाठवाव्यात असे आवाहन निवड समितीच्या वतीने करण्यात आले.