गांजाची वाहतूक; १५ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त
सोलापूर प्रतिनिधी: कुरूल कडून मोहोळकडे झायलो गाडीतून घेऊन जात असलेला गांजा मोहोळ पोलिसांच्या पथकाने पकडल्याची घटना दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री १० : ४५ वाजण्याच्या दरम्यान हॉटेल छावा हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून ८५ किलो ५०० ग्रॅम गांजा व झायलो कार असा एकूण १५ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. एच.१४,बी. ए.४५३८ या क्रमांकाच्या झायलो कारमधून कुरूल कडून मोहोळच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहराच्या हद्दीतील छावा हॉटेल जवळ पोलिसांच्या पथकाने सापळा लावला.
मिळालेल्या माहितीनुसार त्या क्रमांकाची झायलो कार समोरून येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. या कारची झडती घेतली असता त्यामध्ये कारच्या डिक्कीत ४ सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष त्याचे वजन केले असता ८५ किली ५०० ग्राम त्याचे वजन भरले.
पोलिसांनी गाडीतील यशवंत सौदागर जगताप, रा. सोहाळे, ता. मोहोळ, नानुमा बेलारसन बेबरता, सपनकुमार बेलारसन बेबरता, जोत्स्ना सपनकुमार बेबरता, तिघे रा. टांडीगुडा, ता. आर उदयगीर, जि. गजपती, राज्य उडीसा यांना हा गांजा कोणाकडुन आणला व कोणास विक्री करणार आहे या बाबत विचारपूस केली असता ते उडवा उडविचे उत्तरे देवू लागले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा झायलो अंदाजे नऊ लाख रुपये किंमत व ४ सुटकेस मधील ८५ किलो ५०० ग्रॅम गांजा असा एकुण १५ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त केला.
ही कारवाई मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आतकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, पवार, ढवळे, सिद्धनाथ मोरे, अमोल जगताप, गणेश सावंत आदींच्या पथकाने केली. मोहोळ पोलीस अधिक तपास करत आहेत.
परिसरात मोेठी खळबळ
मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसापूर्वी गांजा पकडण्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी मोहोळ पोलिसांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.