अर्थमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमुळे पंढरीच्या सौंदर्यात भर
येथे नगरपरिषदेने दिलेल्या जागेवर वन विभागाने उभारलेले तुळशी वृंदावन अवघ्या एक वर्षात तयार करण्यात आले असून ते पंढरीच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणल्याने येथील हालचालींवर काटेकोर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. दरम्यान हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्याने येणार्या भाविकांना याचे आकर्षण राहिल. तुळशी वृंदावन हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पंढरीसाठीचा ड्रिम प्रोजेक्ट मानला जातो.
पंढरपूरला आलेले भाविक हे चंद्रभागा स्थान, भक्त पुंडलिकाचे दर्शन, श्री विठ्ठल व रखुमाईची भेट घेवून परतीच्या प्रवासाला लागतात. काहीजण गोपाळपूरला गोपाळकृष्ण मंदिराला भेट देतात. मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला महत्व असते. याव्यतिरिक्त पंढरीत पाहण्यासारखे फारसे काही नाही. यास्तव नमामी चंद्रभागाच्या योजनेच्या बैठकीदरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तुळशी वृंदावन तयार करण्याची घोषणा केली. पालिकेने यमाई तलावाच्या शेजारची जागा देवू केली. अवघ्या एक वर्षात ही जागा सुंदररित्या विकसित करण्यात आली आहे. आठ कोटी रूपये खर्च करून येथे संतांची मंदिर तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर येथे विविध प्रकारच्या तुळशीचे आणि विविध प्रकारच्या फुलांचीही लागवड करण्यात आली आहे. या तुळशी वनाच्या मधोमध संगीत कारंजे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तुळशी बनामध्ये 24 फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. हा संपूर्ण वृंदावनाचा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले असून दोन दिवसात एल.ई.डी. स्क्रीन बसविण्यात येत आहेत. तुळशी बनाला बंदीस्त करण्यात आले असून तिन्ही बाजूंनी संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे. बाहेरील बाजूला काटेरी तारेचे कुंपण तयार करण्यात आल्यामुळे हे वन सुरक्षित झालेले आहे. तिन्ही बाजूंनी असलेल्या भिंतीच्या आतील बाजूला संत परंपरेतील चित्र कथा जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी रेखाटली आहेत.
श्रीविठ्ठल मूर्तीच्या चौथर्याच्या तिन्ही बाजूंनी पालखी सोहळ्याचे शिल्प फायबरमध्ये कोरण्यात आलेली असून समोरच्या बाजूला डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेली महिला भाविक आणि वारकर्यांचे फायबरचे शिल्प साकारण्यात आलेले आहे. अतिशय कल्पकरित्या या तुळशी वृंदावनाची रचना करण्यात आलेली असून सुमारे आठ महिन्यांपूर्वी वन विभागाकडून या वृंदावनाची उभारणीचे काम सुरू आहे. स्वागत कमान, महिला, पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचीही उभारणी पूर्ण झालेली आहे. या तुळशी वृंदावनासाठी पंढरपूर नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे. याचे लोकापर्ण 25 रोजी होत आहे.