ब्राह्मण आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा
सोलापूर – समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवार, 22 रोजी मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यास शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेचे सन्मवयक शिवाजी सावंत आणि सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र ब्राह्मण समाज समन्वयक प्रा. मनोज कुलकर्णी यांना दिले. यावेळी उद्योगपती गिरीश काळे, शहर समन्वयक विक्रम डोनसळे ,महाराष्ट्र प्रभारी दिनेश कुलकर्णी,अक्कलकोटचे योगेंद्र पुजारी उपस्थित होते.
ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरूणांना शैक्षणिक व व्यावसायिक तसेच रूग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, 500 कोटींची तरतूद करावी, ब्राह्मण समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, पुरोहितांना मानधन देवून विविध मंदिरात त्यांची नियुक्ती करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करावे, सावकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे, बाजीराव पेशव्यांचे अलौकिक शौर्य व युद्धाच्या इतिहासाचे संग्रहालय व पेशवे सृष्टी निर्माण करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध संस्था आणि संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. आता राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेला शिवसेना पक्षानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
पंढरपूर, कुर्डूवाडी आणि माढ्यात बैठक
22 जानेवारी रोजी मुंबई येथे होणार्या आंदोलनाची माहिती संपूर्ण जिल्ह्यात व्हावी, यासाठी मनोज कुलकर्णी, शहर समन्वयक विक्रम डोनसळे , महाराष्ट्र प्रभारी दिनेश कुलकर्णी , पुरोहित संघाचे मधुकर कुलकर्णी , उमेश काशीकर व सहकारी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेत आहेत. मंगळवारी पंढरपूर, कुर्डूवाडी आणि माढा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. या तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव मेळाव्यास उपसिथत राहतील, असे मनोज कुलकर्णी यांनी सांगितले.