अवैध धंद्यामुळे तडकाफडकी सहा पोलिस निरीक्षकांची बदली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांनी शनिवारी पोलिस दलात खळबळ उडाली. फक्त तोंडी आदेशाने अवैध धंद्यामुळे तडकाफडकी बदल्या केल्याची चर्चा पोलिस दलात रंगली होती. काही पोलिस अधिकार्यांची नियंत्रण कक्षात, तर काहींची पुन्हा मूळ नेमणुकीच्या ठिकाणी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस अधिकार्यांनी मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतेच ठोस कारण दिले नाही. बदलीचे लेखी आदेशही काढले नाहीत. त्यामुळे संभ्रमावस्था होती. बदल्या करायच्याच होत्या, तर लेखी आदेश का काढले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शाहूपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, गांधीनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली. शाहूपुरीचा कार्यभार पोलिस निरीक्षक संतोष ढोके, लक्ष्मीपुरी ठाण्याचा कार्यभार कणेरकर, तर गांधीनगरचा कार्यभार सागरवाल यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक होडगर यांचीही नियंत्रण कक्षात बदली झाली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्याही बदल्यांचे आदेश निघाल; मात्र काही वेळातच त्यांना पुन्हा नेमणुकीच्या ठिकाणी कायम राहण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिस दलातील या आश्चर्यकारक बदल्यांमुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.